
त्या महिलेच्या डोक्यावर आलेला अडीच किलो वजनाचा डोलारा अनिसच्या कार्यकर्त्यांनी उतरवला.
बेलापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात एका कुटुंबातील महिलेच्या डोक्यात केसांचा जुडगा झाला होता. सन 2019 पासून केसाचा गुंता होण्यास सुरुवात झाली. हळूहळू तो गुंता वाढतच गेला व लांबलचक असलेले केस एकमेकांना घट्ट चिकटले. काहीही केल्या हा गुंता सुटेना. हा गुंता सुटण्याकरिता वेगवेगळे साबण, वेगवेगळ्या शाम्पूचा वापर करण्यात आला; परंतु केसाचा गुंता अधिकच जाड होत गेला. त्यामुळे हे कुटुंब पुरते हवालदिल झाले.
काय करावे हे सुचेनासे झाले. त्यातच हा प्रकार म्हणजे एखाद्या दैवताचा कोप असावा, असा समज काहींनी करून दिल्याने या कुटुंबाने भोंदू बाबाकडे धाव घेतली. अगोदर भोंदू बाबाने या महिलेच्या गळ्यात मण्यांची एक माळ घातली व त्या मोबदल्यात पंचवीस हजार रुपये घेतले. त्यानंतर या डोक्यावर आलेल्या बटीचा पूर्ण बंदोबस्त करावयाचा असल्यास एक लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले.महिलेचा मुलगा व पती यांचा यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या अॅड. रंजना गवांदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी फोनवरच त्या सर्व कुटुंबाचे समुपदेशन केले. त्यानंतर आम्ही समक्ष भेट देण्याकरता येतो असे सांगितले. त्यानंतर अॅड. गवांदे, छायाताई विनायकराव बंगाळ, देविदास देसाई, अशोक गवांदे आदी अंनिसचे कार्यकर्ते त्या कुटुंबाच्या घरी गेले.सर्व प्राथमिक माहिती घेतल्यानंतर हा प्रकार केवळ अंधश्रद्धेचा असून तुमच्या अज्ञानाचा बुवा व भोंदू बाबा फायदा घेत असल्याचे त्या कुटुंबाला पटवून दिले.
त्यानंतर ती महिला बट कापू देण्यास तयार झाली. अॅड. रंजना गवांदे यांनी स्वतःच्या हाताने त्या महिलेच्या डोक्यावर आलेली अडीच किलो वजनाची ती बट कापली.डोक्यावरील अडीच किलोचा भार सहा वर्षांपासून झेलणार्या या महिलेला मणका आणि खांद्याचे विकार सुरू झाले होते. रात्री झोप येत नव्हती. कायम डोके दुखत असायचे परंतु ही अडीच किलोची बट काढल्यानंतर त्या महिलेला डोके एकदम हलके झाल्यासारखे वाटले. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही, तिच्या चेहर्यावरचा आनंद पाहून अंनिसचे कार्यकर्तेही भारावून गेले.दरम्यान, कुणीही भोंदूबाबाच्या आहारी जाऊ नका. केवळ आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे लोक समाजाची फसवणूक करीत असतात. अशा भोंदू बाबापासून सावध राहा. कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी तत्काळ अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. गवांदे यांनी केले.