
महाकुंभमेळ्यासाठी गेलेले खेडचे तिघे बेपत्ता
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी २५ जानेवारी रोजी गेलेले खेडचे तिघेजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन आर. चव्हाण (२२), सिद्धांत राठोड, गिरीजाबाई (४८) अशी बेपत्तांची नावे आहेत. सुभाष राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रयागराज-उत्तर प्रदेश पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. त्या तिघांचाही अद्याप कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. या बाबत प्रयागराज पोलिसांनी खेड पोलिसांशी संपर्क साधत शोध घेण्याबाबत कळवले आहे. प्रयागराज येथील जाणार्या महाकुंभमेळ्यासाठी भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने कोकणमार्गे उड्डुपी-टुंडला स्पेशलच्या फेर्या चालवल्या होत्या.
या स्पेशलमधून कोकणातील अनेक भाविक कुंभमेळ्यासाठी गेले होते. खेड तालुक्यातूनही अनेक भाविकांनी महाकुंभमेळ्यासाठी हजेरी लावली होती. प्रचंड गर्दीतही प्रयागराज येथे शाहीस्नान केल्यानंतर भाविक माघारी परतले होते. सचिन चव्हाण, सिद्धांत राठोड, गिरीजाबाई हे तिघेही कुटुंबियांसमवेत प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी गेले होते. मात्र महाकुंभमेळा आटपूनही या तिघांचा कुटुंबियांशी संपर्कच झालेला नाही. अखेर कुटुंबियांनी प्रयागराज पोलीस ठाणे गाठत तिघेही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.www.konkantoday.com