राजापूर तालुक्यातील दोन गावांची टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी.

राजापूर तालुक्याचा टॅंकर लांजा पंचायत समितीकडे वर्ग : खासगी टॅंकरवर मदार.

राजापूर : दिवसेंदिवस वाढत जाणारा प्रचंड उष्मा व भूगर्भातील खालावलेली पाणी पातळी यामुळे तालुक्यातील आडवली पुजारेवाडी व मोगरे सडेवाडी या दोन गावांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली असून, पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत अजून भर पडण्याची शक्यता आहे.गतवर्षी राजापूर तालुक्यातील एकूण ९ गावांमधील ११ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसल्याने या ९ गावांतील ११ वाड्यांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केल्याने त्यांना एका खासगी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला होता. यावर्षी पुन्हा राजापूर तालुक्यातील अनेक गावे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. त्यातच आता राजापूर तालुक्यातील आडवली पुजारेवाडी व मोगरे सडेवाडी या गावांनी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उन्हाच्या कडाक्यामुळे अजून काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांत तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची अनेक कामेही अर्धवट स्थितीत असून, अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीही आहेत. एकीकडे शासन टॅंकरमुक्तीचा नारा देत असताना पाणी योजनांमध्ये वाढत जाणारा भ्रष्टाचार शासनाच्या टँकरमुक्तीच्या स्वप्नाला बाधा आणणारे ठरत आहे. राजापूर शहरातही पाणी टंचाई जाणवू लागली असून राजापूर नगर पालिकेने १६ एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.सन २०१७ – २०१८ या वर्षात राजापूर तालुक्याला प्रशासनाने घाइगडबडीत टॅंकरमुक्त घोषित केले होते; मात्र तालुका टॅंकरमुक्त होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांकडे कानाडोळा केला होता. त्याचे आज परिणाम जाणवू लागले असून यावर्षीही अनेक गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

सन २०१७ – १८ या वर्षात राजापूर तालुक्याला टॅंकरमुक्त घोषित करत राजापूर पंचायत समितीने शासनाकडून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मिळालेला एकमेव टॅंकरही लगतच्या लांजा तालुक्याकडे वर्ग केला होता. परिणामी आता राजापूर तालुक्यासाठी शासनाचा हक्काचा व स्वताचा टॅंकर नसल्याने खासगी टॅंकरवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यातच खासगी टॅंकर मालकांना शासनाकडून मिळणारे अत्यल्प भाडे व तेही वेळेवर मिळत नसल्याने खासगी टॅंकरमालकही टॅंकर देण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी तालुक्यातील अनेक गावांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.राजापूर तालुक्यासाठी आलेला टॅंकर लांजा पंचायत समितीकडे वर्ग केल्यानंतर आता तालुक्याला टॅंकरची आवशकता असताना देखील तो पुन्हा घेण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून कोणत्याच हालचाली होत नसल्याची बाब गेल्या दोन वर्षांत समोर आली आहे. त्यावरून राजापूर पंचायत समिती व तालुका प्रशासन पाणी टंचाईच्या बाबतीत गंभीर नसल्याचे पुढे आले आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा फटका राजापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला बसत असून तालुकवासियांना पाण्यासाठी हंडा डोक्यावर घेऊन डोंगर कडेकपारी व रानोमाळ भटकावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button