
अंजनवेलचा गोपाळगड किल्ला अनधिकृत बांधकाममुक्त होणार.
राज्य संरक्षित झालेल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगडावर येथील जागामालकाने केलेले अनधिकृत बांधकाम तातडीने काढून टाकावे, अशी नोटीस येथील जागामालकाला पुरातत्त्व विभागाने बजावली आहे, तर राज्य संरक्षित नोटिफिकेशनला आव्हान देणारी जागामालकांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.यामुळे अंजनवेलचा गोपाळगड किल्ला अनधिकृत बांधकाममुक्त होणार आहे.पुरातत्त्व विभागीय कार्यालयाच्या सहाय्यक संचालकांनी १७ मार्च २०२५ ला सुफिया युनूस मणियार व कादिर हुसेन मणियार यांना गोपाळगड किल्ला या राज्य संरक्षित क्षेत्रातील गट क्र. ८२ व ८३ मध्ये केलेले अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे.
नोटिसीवर म्हणणे मांडण्यासाठी २ एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत दिली होती; परंतु यावर कोणतेच म्हणणे सादर झालेले नाही. त्यामुळे किल्ल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अंजनवेल येथील दाभोळ खाडीच्या मुखाजवळ उभारलेला गोपाळगड किल्ला १९६० मध्ये अवघ्या ३० रुपयांत शासनाने विकला होता. हा किल्ला शासनाने ताब्यात घ्यावा म्हणून शिवतेज फाउंडेशनसह अनेक दुर्गप्रेमी लढत होते. शिवतेज फाउंडेशनने गोपाळगड किल्ल्याच्या मुक्ततेसाठी अर्ज केला. गुहागरवासीयांच्या सह्यांचे पत्र दिले. गोपाळगड किल्ल्याच्या जमीन मोजणीची मागणी केली.