
वक्फ विधेयकामुळे गरीब, महिला आणि मागासवर्गीय मुस्लिमांना थेट लाभ मिळेल-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जाकीर शेकासन.
वक्फ मालमत्तांचा योग्य वापर, व्यवस्थापनात पारदर्शकतेची कमतरता आणि काही ठिकाणी गैरप्रकारांमुळे गरीब मुस्लिमांना त्याचा फायदा मिळत नव्हता.वक्फ विधेयकामुळे वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शी आणि प्रभावी होणार आहे तसेच समाजातील गरीब, महिला आणि मागासवर्गीय मुस्लिमांना याचा थेट लाभ मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केला.विधेयक मंजूर झाल्यानंतर शेकासन म्हणाले, वक्फ बोर्डात आता शिया, सुन्नी, बोहरा, आगाखानी यांसारख्या वेगवेगळ्या मुस्लिम सांप्रदायांचे प्रतिनिधी असतील. याशिवाय, महिलांना आणि मागासवर्गीय (पसमांदा) मुस्लिमांना बोर्डात स्थान मिळणार आहे.
या विधेयकामुळे वक्फ मालमत्तांवरून होणारे वाद आता कोर्टात नेले जाऊ शकतील. यापूर्वी २०१३ च्या कायद्यात वक्फ बोर्डाच्या निर्णयांना कोर्टात आव्हान देता येत नव्हते, त्यासाठी ट्रिब्युनल होते; मात्र आता ही अडचण दूर झाली आहे. मालमत्तांचे ऑडिट आणि नोंदणी अनिवार्य झाल्याने गैरव्यवहार थांबतील आणि त्यातून मिळणारा पैसा समाजाच्या भल्यासाठी वापरला जाईल. विधेयकातील मुख्य तरतुदीमध्ये वक्फ बोर्डात किमान दोन महिलांचा समावेश अनिवार्य असेल, वेगवेगळ्या मुस्लिम संप्रदायांचे प्रतिनिधी बोर्डात असतील.
ज्यामुळे कोणताही गट वंचित राहणार नाही, वक्फ मालमत्तांचे ऑडिट आणि केंद्रीय डाटाबेसमध्ये नोंदणी बंधनकारक असेल, वक्फ बोर्डाच्या निर्णयांना कोर्टात आव्हान देता येईल, गैरमुस्लिमांचा समावेश फक्त प्रशासकीय कामांसाठी असेल, धार्मिक बाबींमध्ये नाही, असे त्यांनी सांगितले.या विधेयकामुळे वक्फ मालमत्तांचा गैरवापर थांबेल आणि त्यातून मिळणारा नफा समाजाच्या प्रगतीसाठी वापरला जाईल. हा कायदा मुस्लिम समाजाच्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी आहे