
एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार; उन्हाचा चटका सहन करायची तयारी ठेवा
यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज सोमवारी (ता. ३१) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे.
दक्षिण भारताचा पश्चिमेकडील भाग, पूर्व-मध्य आणि पूर्व भारतात कमाल तापमान सरासरीजवळ राहणार आहे. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमानही सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे.
एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत दक्षिण द्वीपकल्पाचा उत्तर आणि पूर्व भाग, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून महिन्यात साधारणतः २ ते ४ दिवस कालावधीच्या उष्ण लाटा अनुभावायला मिळणार आहेत.
गुजरात, महाराष्ट्रासह पश्चिम भागात उष्ण लाटांचे दिवस अधिक राहण्याची शक्यता आहे. यात राजस्थान, गुजरात, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये तीव्र उष्ण लाटांची शक्यता आहे.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या सौम्य ‘ला-निना’ स्थिती असून, पाण्याचे तापमान तटस्थ स्थितीकडे जात आहे. सध्या प्रशांत महासागराच्या पूर्व आणि पश्चिमेकडील भागात सरासरीपेक्षा अधिक तर मध्य भागात सरासरीपेक्षा कमी तापमान आहे.
मॉन्सून हंगामात प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ना ‘ला-निना’, ना ‘एल-निनो’ म्हणजेच तटस्थ स्थितीत राहण्याची शक्यता आहे. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल स्थिती (आयओडी) तटस्थ असून, मॉन्सून हंगामात तटस्थ किंवा ऋण (निगेटिव्ह) राहण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात राज्यासह देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. यात सलग २ ते ५ दिवस कालावधीच्या उष्ण लाटा अनुभावायला मिळण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटा दिसून येतील.
गुजरात, तसेच पूर्व किनारपट्टी आणि पूर्व भारतातही उष्ण लाटांचा इशारा आहे. तर देशात सरासरी इतक्या (८८ ते ११२ टक्के) पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर विदर्भसह उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.