
अॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त.
आपल्याला काहीही ऑनलाईन ऑर्डर करायचं झालं तर पहिल्यांदा आपण अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या वेबसाईट्स चाळतो. पण, अशा ई कॉमर्स साईट्सवरुन तुम्ही नकली सामान तर खरेदी करत नाही ना?सांगायचं कारण म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापे टाकले. यामध्ये अनेक दर्जाहीन आणि प्रमाणपत्रे नसलेली उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. १५ तास चाललेल्या या कारवाईत BIS अधिकाऱ्यांनी सुमारे ७० लाख रुपये किमतीचे गिझर आणि फूड मिक्सरसह ३,५०० हून अधिक इलेक्ट्रिकल उत्पादने जप्त केली.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट रडारवरग्राहकांचे हित लक्षात घेत गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी BIS द्वारे देशव्यापी मोहिम चालवली जात आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दिल्ली, गुरुग्राम, फरीदाबाद, लखनौ आणि श्रीपेरंबदूरसह अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आले होते.सध्या, ७६९ उत्पादन श्रेणींना भारतीय नियामकांकडून अनिवार्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
योग्य परवान्याशिवाय या वस्तूंची विक्री किंवा वितरण केल्यास २०१६ च्या BIS कायद्यानुसार संभाव्य कारावास आणि दंडासह कायदेशीर दंड होऊ शकतो. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने या छाप्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी बीआयएसने लखनौमधील अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामावरही छापा टाकून बनावट वस्तू जप्त केल्या होत्या.