
राजापूर-कोल्हापूर काजिर्डामार्गे अजून एका घाटरस्त्याला मंजुरीआराखडा तयार करून सर्वेक्षणासाठी एका कंपनीला ठेका.
राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्या यापूर्वी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राजापूर व कोल्हापूर यांना जोडणाऱ्या काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, परराज्यातील एका कंपनीला सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले असल्याची माहिती संबंधित बांधकाम विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत कोकणातून कोल्हापूरला जोडणारा आणखी एक घाटमार्ग तयार होणार असल्याने आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
चार वर्षांपूर्वी (जुलै २०२१) कोकणात झालेल्या अतिवृष्टीत काही घाटांत दरडी कोसळून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही दिवस बंद पडला होता. त्या पार्श्वभूमीवर कोकण – कोल्हापूरसाठी एखादा भक्कम आणि तेवढाच महत्त्वपूर्ण घाट असणे किती गरजेचे आहे ते अधोरेखित झाले होते आणि मागील अनेक वर्षे अडगळीत पडलेल्या काजिर्डा घाटाचा मुद्दा प्रकाशात आला होता. त्यानंतर त्याचा पाठपुरावा सुरू झाला होता.
नियोजित काजिर्डा घाटाला मागील काही संदर्भ आहे. यापूर्वी ७० च्या दशकात (१९७४/७८) रोजगार हमी योजनेतून काजिर्डा-कोल्हापूर जोडणाऱ्या घाटाच्या खोदकामाचे काम हाती घेण्यात आले होते; मात्र त्याच दरम्यान अणुस्कुरा घाटाच्या खोदकामाला आरंभ झाला आणि काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचे काम मागे पडले ते कायमचेच. नंतर अणुस्कुरासह गगनबावडा घटना महत्त्व प्राप्त झाल्याने काजिर्डा घाट मार्ग विजनवासात गेला. नंतरच्या कालखंडात काजिर्डा गावात मोठा लपा प्रकल्प मंजुर झाला आणि त्याचे काम देखील सुरू झाले होते. तथापि अनेक मुद्द्यांवरून स्थानिक जनतेतून संघर्षाची भूमिका राहिल्याने तो प्रकल्प देखील रखडला. शिवाय अन्य काही कारणे देखील त्यामागे होती. तरीही अधूनमधून काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचा मुद्दा चर्चेत असायचाच.
मध्यंतरीच्या काळात मनसेच्या वतीने या घाटातील साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार लोकवर्गणीतून घाटातील पायवाट साफ करण्यात आली होती.चार वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीत कोकण-कोल्हापूरला जोडणाऱ्या अनेक घाटांत मोठ्याप्रमाणावर पडझड झाली होती. आंबा घाट देखील त्यातून सुटला नव्हता. त्यावेळी केवळ अणुस्कुरा घाटमार्गातून कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रकडे जाणारी वाहतूक सुरू होती. सर्व प्रकारची वाहतूक अणुस्कुरा मार्गे रात्रंदिवस सुरु राहिल्याने त्या घाटात देखील खड्डे पडले होते. त्यामुळे अणुस्कुरा घाट सुध्दा असुरक्षित होतो की काय अशी चिन्हे दिसत होती.
अशावेळी कोकण – कोल्हापूरला जोडणाऱ्या आणखी एका सुरक्षित व तेवढ्याच भक्कम घाटरस्त्याची गरज जाणवू लागली आणि अडगळीत जाऊन पडलेला काजिर्डा घाटमार्ग एकदम उजेडात आला. कोल्हापूर कोकणला जोडणारा भक्कम आणि सुरक्षित रस्ता म्हणून काजिर्डा घाटाकडे पाहिले गेले आणि काजिर्डाची दुसरी इनिंग सुरू झाली. काजिर्डा घाट खोदकामप्रकरणी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी लक्ष घातले आणि तो प्रश्न शासन दरबारी लावून धरला होता. त्या मुद्द्यावरून सातत्याने पाठपुरावा केला.
काजिर्डा घाटमार्ग कसा उपयुक्त आहे ते पटवून दिले. अखेर त्या प्रश्नी शासनाने सकारात्मकता दर्शविली आणि दोन वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्व्हेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याचे तालुक्यातून जोरदार स्वागत झाले होते. अर्थसंकल्पात तरतूद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचा आराखडा तयार झाला होता. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर त्या सर्व्हेक्षणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कंपनीसाठी निविदा काढण्यात आली. त्यानुसार पर राज्यातील एका कंपनीला ते काम मिळाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
नजीकच्या काळात प्रत्यक्ष काम सुरू होईल आणि त्याचा अहवाल संबंधित विभागाला सादर केला जाईल.काजिर्डा घाट मार्गाची ठळक वैशिष्ट्ये- काजिर्डा-कोल्हापूर हे अंतर सुमारे ५० ते ५५ किमीचे असून अन्य घाट मार्गाच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५ किमी अंतर वाचू शकणार आहे. पडसाळी (कोल्हापूर) ते बाजारभोगाव अंतर सुमारे २० किमी, तर बाजार भोगाव ते कोल्हापूर अंतर ३० ते ३५ किमी आहे.- राजापूर तालुक्यातील सर्वात सोपा असा घाट.- रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घाट.- काजिर्डा घाट चार ते साडेचार किमीचा असला तरी त्यातून सुरक्षित केला जाणारा रस्ता लक्षात घेता जवळपास आठ ते दहा किमीची घाटाची व्याप्ती होवू शकते.- रत्नागिरी ते काजिर्डा अंतर ९५ किमी आहे. या घाटामुळे आजूबाजूच्या ५५ ते ६० गावांना कोल्हापूरसाठी फायदा होणार आहे.- काजिर्डा गावात धरण प्रकल्प घाटाच्या पायथ्याशी आहे, त्याला वळसा घालून वरच्या बाजूने मार्ग गेल्यास पर्यटनाच्या दृष्टीने घाटाला महत्त्व येईल. – कोल्हापूर, कळे, बाजार भोगाव, काळजवडे, पडसाळी, काजिर्डा, मूर, तळवडे, पाचल, रायपाटण, ओणी, राजापूर असा त्या घाटरस्त्याचा मार्ग असेल. पश्चिम पन्हाळा तालुक्यातील शेवटचे गाव पडसाळी आहे.
– अणुस्कुरा, गगनबावडा घाटांमुळे हा घाट काहीसा दुर्लक्षित.- पूर्वी कोल्हापूरातून याच काजिर्डा घाटमार्गे पायी वाहतूक सुरू होती. व्यापारीदृष्ट्या या घाटाला महत्त्व होते. बाजुलाच मुडागड आहे. पर्यटनात्मकदृष्ट्या त्या गडाला महत्त्व आहे. पूर्वी या घाटातून होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवली जात असे.- नियोजित काजिर्डा घाटामुळे सुमारे ३० ते ३५ किमी अंतराची व एक तास प्रवासाची बचत होईल.- राजापूर तालुक्यातून अणुस्कुरानंतर आणखी एक घाट कोल्हापूरसाठी उपलब्ध होईल.