
विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. या नव्या सरकारची विधीमंडळाची दोन अधिवेशनं पूर्ण झाली आहेत.मात्र, विरोधी पक्ष नेतेपद सध्या रिक्तच आहे. शिवसेना ठाकरे गट हा विरोधी बाकावरील मोठा पक्ष असून त्यांनी आणि महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र, त्यावर अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी विरोधी पक्षनेते पदाच्या नावाची घोषणा होईल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानसभा विरोधी पक्ष नेता निवड होण्यासाठी विरोधी पक्षाचा 29 आमदारांचा कोरम पूर्ण हवा, अशी चर्चा आहे. मात्र, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना विधीमंडळ सचिवालयाने पाठवलेल्या पत्रानुसार, संख्याबळाची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. विरोधी पक्षनेता पद देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचे पत्रात म्हटले.विधानसभेत मंगळवारी बोलताना भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेत्याच्या घोषणा अद्याप न केल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले की, माझे नाव देण्यात आल्याने मी मुद्दा उपस्थित करतोय असे नाही. तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना विनंती करून दुसऱ्या नावाचे पत्र देईल असेही त्यांनी सांगितले. भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्षनेता असे नको, अशी भावना ठेवू नका. पद म्हणजे परमेश्वर नाही, मी कधीही पदाची लालसा ठेवली नसल्याचेही भास्कर जाधवांनी म्हटले.राज्यात याआधीदेखील विरोधी बाकांवरील आमदारांची संख्या कमी असली तरी विरोधी पक्षनेते पद देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय संकेत आणि संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली लक्षात घेत विरोधकांकडून विरोधी पक्षनेते पदाची मागणी करण्यात येत आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घोषीत करण्याची शक्यता आहे. विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.




