कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, प्रतिकार करताना शेतकरी झाला जखमी पण बिबट्याला केले ठार.

कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला.स्वतःच्या बचावादरम्यान शेतकऱ्याने बिबट्याला जमिनीवर आपटले आणि टोकदार भाल्याने जखमी केले. झटापटीदरम्यान बिबट्या जागीच ठार झाला. चिपळूण तालुक्यातील मौजे वारेली येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तोंडली-वारेली परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता. तोंडली-वारेली गावच्या सीमेवर आशीष शरद महाजन (वय ५५) या शेतकऱ्याचे घर आहे. त्यांच्याकडे जनावरे आणि पाळीव कुत्रा आहे. शनिवारी रात्री ११.३० ते १२च्या दरम्यान महाजन यांचा कुत्रा भुंकत होता. तो का भुंकतोय, हे पाहण्यासाठी महाजन घराबाहेर पडल्यानंतर त्यांना कुत्र्याच्या दिशेने येणारा बिबट्या दिसला.

महाजन यांनी कुत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर बिबट्याने महाजन यांच्यावरच हल्ला चढवला. दोघांमध्ये झटापट झाली. झटापटीत बिबट्याने महाजन यांच्या दोन्ही पायावर, उजव्या हाताला, तोंडावर आणि डोक्यावर जखमा केल्या. रक्तबंबाळ झालेल्या महाजन यांनी बिबट्याला पकडून जमिनीवर आपटले. दोघांमध्ये सुरू असलेला संघर्ष महाजन यांच्या पत्नी सुप्रिया यांनी पाहिला. सुप्रिया यांनी टोकदार भाला आणून महाजन यांना दिला. महाजन यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरलेल्या भाल्यामुळे जखमी होऊन झटापटीमध्ये बिबट्या जागीच ठार झाला.दोघांत संघर्ष सुरू असताना सुप्रिया यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले.

महाजन हे गंभीर जखमी झाल्याचे पाहिले. त्यांच्यावर वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून डेरवण येथील रुग्णालयात दाखल केले.विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान यांनी सहकाऱ्यांसह मृत बिबट्याची तपासणी केली. मृत बिबट्या मादी असून तिचे वय अंदाजे १.६ ते २ वर्ष असल्याचे आढळले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button