फणसवळे येथील आंबा बागेत बिबट्या आढळला मृतावस्थेत

रत्नागिरी : शहराजवळील फणसवळे येथे भगवान श्रीपत पाटील यांच्या आंबा बागेत फडकी तोडून जखमी झालेला बिबट्या आढळून आला; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. ही घटना आज (१६ मार्च) सकाळी ७.३० सुमारास निदर्शनास आली. याविषयी सविस्तर माहिती अशी की, फणसवळे येथे भगवान श्रीपत पाटील यांच्या आंबा बागेत बागेत गुरखा फेरी मारत असताना बिबट्या फासकी तोडून फासकीसहित बागेत बसलेला दिसून आला.

याबाबत वन विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर वनपाल पाली, वनरक्षक जाकादेवी यांनी जागेवर जाऊन खात्री केली असता या बिबट्याच्या कमरेला फासकी लागलेली दिसून आली. ही फासकी तोडून आल्याचे निदर्शनास आले. हा बिबट्या मोठमोठ्याने धापा टाकत होता, तसेच निपचित पडला होता. तात्काळ रेस्क्यू टीम व पिंजरा बोलवून पोलिसांच्या माध्यमातून ग्रामस्थांना बाजूला करण्याचे काम करून, पिंजरा व जाळीच्या साह्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्धावथेत गेला. त्यानंतर थोड्याच वेळात बिबट्या मृत झाला.

या आंबा कलम बागेला सभोवर दगडी बांध असून त्यावर काटेरी कुंपण आहे. बिबट्या मृत झाल्याने रत्नागिरी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शव विच्छेदन करून घेतले. हा बिबट्या नर जातीचा असून, तो सुमारे ७ वर्षे वयाचा होता. मृत शरीर सर्व अवयवासहित जाळून नष्ट करण्यात आले. याकामी वनविभागाने गुन्हा नोंद केला आहे. ही फासकी कोठे व कोणी लावली याबाबत वन अधिकारी शोध घेत असून, पुढील तपास चालू आहे. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळून श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

या कमी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एएसआय श्री. सावंत, श्री. भाटले पोलीस हवालदार श्रीमती पालवे, होमगार्ड श्री. पालते, श्री. नाखरेकर यांच्या तसेच स्थानिक ग्रामस्थ पोलीस पाटील सुजाता आंबेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी काम परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे, रेस्क्यू टीम अनिकेत मोरे, महेश धोत्रे हे उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास वन विभागाला तात्काळ कळविण्याबाबत रत्नागिरीच्या विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई यांनी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या नंबरवर कळविण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button