
प्रतिज्ञापत्रासाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ; महायुती सरकारचा मोठा निर्णय.
मुंबई:* महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ केल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण आता हलका होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली.लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्याने महसूल वाढीसाठी मुद्रांक शुल्काच्या दरात 100 रुपयांवरुन 500 रुपये वाढ केलेली आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता.
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कारणास्तव अनेकदा प्रतिज्ञापत्रे सादर करावे लागतात. पण प्रतिज्ञापत्र ज्या मुद्रांकावर प्रिंट केले जातात, सरकारने त्या मुद्रांकाचे दर वाढवले. हे दर 100 रुपयांवरून थेट 500 रुपये करण्यात आले होते. यामध्ये टायपिंगसाठी किमान 500 रुपये आणि नोटरीसाठी 100 ते 150 रुपये लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रतिज्ञापत्रासाठी 700 ते 1000 रुपयांपर्यंत खर्च येत होता. मात्र, आता विद्यार्थ्यांसाठी मुद्रांक शुल्क माफ केल्याने 500 रुपये वाचणार आहेत.