
गुटखा कारखाना प्रकरणी मुख्य आरोपी फरार, घरमालक अटकेत
चिपळूण :- कामथे येथील गुटख्याच्या कारखान्यावर छापा मारून सुमारे ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बंगल्याच्या मालकास शुक्रवारी अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार झाला आहे.कृष्णा बाळू माटे (६९ , कामथे) असे अटक केलेल्याचे, तर मोहसिन महमद हनिफ मेमन (गोवळकोटरोड) असे फरार असलेल्याचे नाव आहे. याची तक्रार अन्नसुरक्षा अधिकारी दशरथ मारूती बांबळे यांनी दिली. या बंगल्यात गुटख्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्याने गुरूवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी पथकासह छापा मारला. त्यानंतर याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली.ही माहिती वेळेत देऊनही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी येथे उशिरा दाखल झाले. त्यामुळे गुरूवारी रात्री घटना घडूनही गुन्हा मात्र शुक्रवारी दुपारी दाखल झाला. रत्नागिरी उपायुक्त सय्यद इम्रान हाशमी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या उपस्थितीत याचा पंचनामा करण्यात आला. त्यानुसार येथे विमल पान मसाला, गोवा, केशर विमल पान मसाला, विमल गुटखा व्ही टोबॅको या नावाची १ लाख ३५ हजार रूपयांची पाकिटे, १ लाख २० हजार रूपयांचा कच्चा माल, ४ लाख २० हजार रूपयांची मशिनरी, २५ हजार रूपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे असा सुमारे७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कामथे येथील घर क्र. १४३ या बंगल्यात हा कारखाना सुरू होता. त्यामुळे या बंगल्याच्या मालकाचा शोध घेतला असता तो माटे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली. त्याने हा कारखाना ६ महिन्यांपासून सुरू होता व त्या पोटी आपल्याला महिना १२ हजार रूपये भाडे मिळत होते, असे सांगितले आहे. मात्र बंगला भाडय़ाने देताना तेथे सुंगधी सुपारी बनवली जाणार असल्याचे मोहसिन याने सांगितल्याचे माटे याने सांगितले.
www.konkantoday.com