
व्हिजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मुगडाळ खिचडीसहशालेय पोषण आहारात नव्याने 12 पाककृती निश्चित
शालेय पोषण आहारात नव्याने 12 पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संरचित आहार मिळण्यास मदत होणार आहे. व्हिजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मुगडाळ खिचडीसह अन्य विविध मेनू आहारात असणार आहेत.त्यामुळे शालेय पोषण आहार अधिक चवदार व सकस मिळणार आहे.यापूर्वी दिल्या जाणार्या पोषण आहारासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविध 12 प्रकारच्या पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच तांदळापासून बनवलेल्या पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.