
आ. भास्करराव जाधव यांच्या सहकाऱ्यांकडून अण्णा जाधव यांना १० कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस.
चिपळूण: शिवसेना नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत खोटेनाटे आरोप करून त्यांची बदनामी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्याविरोधात आ. श्री. जाधव यांचे मतदार संघातील सर्व सहकारी एकवटले आहेत. त्यांनी अॅड. नितीन केळकर यांच्या माध्यमातून अण्णा जाधव यांना नोटीस पाठवली आहे. नाहक बदनामी केल्याबद्दल तुमच्यावर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा का करण्यात येवू नये? अशा आशयाची ही नोटीस असून ती अण्णा जाधव यांना प्राप्त झाली आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात कळंबट जिल्हा परिषद गटातील एका बैठकीचा संदर्भ देत विकास उर्फ अण्णा जाधव यांनी या बैठकीत आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यावर बौध्द समाजाबद्दल अनुद्गार काढल्याचा खोटा आरोप करत त्यांची बदनामी करण्यास सुरूवात केली आणि त्यांच्याविरोधात जाणीवपूर्वक मोहिम उघडली.
कोणताही गैरशब्द काढलेला नसताना आणि यासंदर्भातील कोणताही पुरावा नसताना त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, मोर्चे काढले आणि त्यामाध्यमातून आमदार श्री. जाधव यांच्यावर अश्लाघ्य शब्दात टीका करून त्यांची बदनामी केली.याच दरम्यान गुहागर तालुक्यातील नरवण येथे एका हाॅटेलमध्ये विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला आ. श्री. जाधव यांनीच घडवून आणल्याचा आरोप करून अण्णा जाधव यांनी त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप केले. या घटनेचा निशेध म्हणून मुंडण मोर्चा काढला, तेव्हादेखील त्यांनी आ. जाधव यांच्यावर अतिशय खोटेनाटे आरोप केले आणि खालच्या स्तरावर जावून टीका केली. प्रत्यक्षात या घटनेचा तपास होवून आरोपिंना पोलिसांनी अटक केली तेव्हा अण्णा जाधव यांनी केलेल्या आरोपांपैकी एकही आरोप सिध्द झाला नाही.
एकूणच केवळ राजकीय सुडापोटी आणि निवडणुकीत श्री. भास्करराव जाधव यांचे नुकसान व्हावे याच हेतूने अण्णा जाधव यांनी वारंवार त्यांच्या बदनामीची मोहिम उघडली होती, हे स्पश्ट झाले. आपल्या नेतृत्वाची नाहक झालेली बदनामी मतदारसंघातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या जिव्हारी लागली. हे सर्व सहकारी एकवटले. त्यांनी कायदेषीर लढा देवून अण्णा जाधव यांना धडा शिकवायचा ठरवला. त्यानुसार अॅड. नितीन केळकर यांच्या माध्यमातून त्यांनी ही अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे.