
शिंदे सेनेत प्रवेश करण्यासाठी साळवी यांच्या पाठोपाठ माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हेदेखील रांगेत उभे
कोकणात शिवसेना उबाठाला धक्क्यावर धक्के बसण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार राजन साळवी यांच्या शिवसेना (शिंदे) प्रवेशाची चर्चा सुरू होती, अखेर तो दिवस आला.मात्र, साळवी हे एकमेव नाहीत, तर यांच्या पाठोपाठ कोकणातील आणखी काही बडे नेते उबाठाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत आहेत.राजन साळवी यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे राजन साळवी हे आमदार होते. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राजापूर, लांजा आणि साखरपा या भागात साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे.शिवसेनेचे माजी आमदार असलेल्या साळवी यांच्या पाठोपाठ माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हेदेखील रांगेत उभे आहेत.
बने यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र रोहन याला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. मात्र चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ महायुती तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला गेला आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार उमेदवार अशी लढत झाली. त्यात अजित पवार यांच्या शेखर निकम यांनी शरद पवार यांच्या प्रशांत यादव यांचा पराभव केला. मधल्यामध्ये बने यांचे स्वप्न भंग पावले. त्यामुळे बने शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, असे सूत्रांनी सांगितले.त्याचप्रमाणे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गणपत कदम हेदेखील नाराज असून बने यांच्यासोबत कदमही लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे कोकणात शिवसेना उबाठा आता केवळ गुहागर मतदारसंघापूरती मर्यादित राहण्याची चिन्हे दिसत आहेत या दोघांनी नुकतीच पालकमंत्री उदय सामंत यांच्या समावेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती