
गावातील पुरातन वृक्ष न तोडण्याचा खरवते ग्रामपंचायतीचा ठराव.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत इतिहासाचे साक्षीदार असलेले गावातील ऐंशी ते शंभर वर्षांपूर्वीचे पुरातन व औषधी वृक्ष न तोडण्याचा एकमुखी निर्णय राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने घेतला आहे.माझी वसुंधरा ५.० अंतर्गत खरवते ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी वृक्षगणना अहवाल प्रसिद्ध केला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे वृक्षगणना कार्यक्रम आयोजित केला.
वृक्षगणनेच्या वेळी जंगलातून फिरताना मोठमोठी इतिहासाची साक्षीदार असलेली विविध प्रकारची पुरातन झाडे पाहून खरवते गावाची एक नव्याने ओळख ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात आली.आजच्या पहिल्या टप्प्यातील वृक्षगणनेत विविध स्थानिक १९८ प्रकारचे पुरातन वृक्ष आढळून आल्याचे नमूद करण्यात आले. पुरातन वृक्षांच्या बुंध्यांचे घेर मोजण्यात आले. साधारण सात मीटर गोलाईचे पुरातन वृक्षदेखील सापडले. अनेक औषधी वृक्षदेखील दृष्टिक्षेपात आले.
हे पुरातन वृक्ष, जंगले आणि पाणवठे हीच या गावाची संपत्ती आहे, यावर सदस्यांचे एकमत झाले. गावातील हे शिल्लकअसलेले पुरातन वृक्ष वाचविण्यासाठी आता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असा निश्चय करून ग्रामस्थांनी ग्रामसभेत पुरातन वृक्षांचे संवर्धन करून ते न तोडण्याचा एक ऐतिहासिक ठराव घेतला.