
रत्नागिरी जिल्ह्यात भाजप स्वबळ वाढवण्याच्या तयारीत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कोकणात सुरूंग लावणार आहे. नुकतीच भाजपच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी कोकणचे सुपुत्र असलेले आ. रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर झाल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात भाजप कोकणकडे लक्ष केंद्रित करणार आहे.कोकणात महायुतीला स्थान मिळाल्याने आता भाजप बळकटीसाठी ‘फिल्डिंग’ लावत आहे. कोकणचे ज्येष्ठ नेते प्रदेश कार्याध्यक्ष झाल्याने आगामी काळात भाजप आपली ताकद वाढविणार आहे. त्या द़ृष्टीने आतापासूनच पावले टाकण्यात येत आहेत.
सद्यस्थितीत कोकणात शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उबाठा यांची ताकद आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कोकणात आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी भाजप उत्सुक आहे. त्यात कोकणचेच सुपुत्र कार्याध्यक्ष झाल्याने त्या द़ृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. लवकरच नगरपालिका, नगरपंचायती, पं. स., जि.प.च्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या द़ृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपच्या वतीने पक्ष सदस्यत्व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.