
देवाच्या पुजाऱ्याला माहीती असतं की देव नाहीय. हे केवळ पैसे कमावण्याचं साधन आहे- अभिनेते वैभव मांगले यांनी नास्तिक मेळाव्यात मांडले मत.
देवाच्या पुजाऱ्याला माहीती असतं की देव नाहीय. हे केवळ पैसे कमावण्याचं साधन आहे, म्हणूनच ही लोकं सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात. आज कुठल्याही मोठया देवस्थानचे ट्रस्टी हे सर्व नास्तिक लोक आहेत.अशा लोकांनी फक्त श्रद्धेचा बुरखा पांघरलेला आहे, असं मत अभिनेते वैभव मांगले यांनी व्यक्त केले.शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित सहाव्या नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते. लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर, इतिहास अभ्यासक डॉ.टी.एस.पाटील, अभ्यासक य.ना. वालवनकर यावेळी उपस्थित होते.मांगले पुढे म्हणाले की, आज आपण खुप असहिष्णु होत चाललो आहोत. ते मला जास्त धोकादायक वाटतं. एक गाय कोणीतरी मारली असा संशय घेऊन माणसाची सामूहिक हत्या केली जाते. ज्या गाई रस्त्यावर फिरून मिळेल ते खातात, पोटात प्लॅस्टिक अडकून त्यांचा मृत्यू होतो, त्यांच्याविषयी यांना काहीच वाटत नाही पण कुठल्यातरी धर्मातल्या माणसाने गाय मारली म्हणून त्यांची हत्या केली जाते, हा किती लाजिरवाणा प्रकार आहे.
ज्या विठ्ठलाला पाहून तुकाराम महाराजांनी अखंड गाथा रचली, ज्ञानेश्वरांना आता विश्वात्मके असं म्हणणारं पसायदान लिहावंस वाटलं या श्रद्धेने यांनी केवढं मोठं साहित्य निर्माण केलं आहे. आज मला वाईट वाटतं की लोकं शिर्डीला चालत जातात,.काही काम नाही का लोकांना? त्यांच्या हाताला काम नाही म्हणूनच हे चाललंय का?हे सगळं माझं भाषण जर कोठे पाठवलं तर मला भीती आहे की कुठूनतरी लोक येऊन माझ्यावर हल्ला करतील. इतके आपण असहिष्णु झालो आहोत का? विद्येच माहेरघर असलेल्या पुण्यात दाभोळकरांची हत्या होते. तिथे आपण काहीच करू शकलो नाही आहोत.
अज्ञान मान्य करण हा विज्ञानाचा आधार आहे. धर्म अज्ञानच मान्य करत नाहीय जे आहे हे पूर्वीपासून असच आहे, असा धर्माचा अर्थ लावला जातोय.एखादी घटना का घडते त्याच्यामागचे लॉजिक मला कळलं पाहिजे. ज्या कुठल्या देवस्थानाला मोठमोठे व्यापारी लोक जातात आणि पार्टनरशिपमध्ये बोली लावतात, ते देवाला चालतं का? जीवनातील प्रत्येक गोष्टीला लॉजिक असतं ते शोधायला आपण लोकांना प्रवृत्त करू या.