
छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या वाहनावर नक्षलवाद्यांकडून स्फोटक हल्ला; नऊ पोलीस जागीच ठार!
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सोमवारी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षलवाद्यांनी स्फोटक यंत्राने उडवलं. या घटनेत आठ पोलीस आणि एक चालक असे एकूण ९ जण शहीद झाले आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.*विजापूर जिल्ह्यातील बेद्रे-कुटू रोडवर हा स्फोट झाला. ५ जानेवारी रोजी (रविवारी) केलेल्या नक्षलविरोधी मोहिमेतून परतत असलेले किमान २० जवान या वाहनात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला.
या स्फोटात आठ जवान आणि चालकासह एकूण नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी मारले गेले होते. त्यानंतर हा हल्ला करण्यात आला. नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील दक्षिण अबुझमाड येथील जंगलात शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दलाच्या जवानांचे संयुक्त पथक नक्षलवादविरोधी मोहिमेवर असताना चकमक झाली. रविवारी सुरुवातीला चार नक्षलवादी मृतावस्थेत आढळले, तर आणखी एक मृतदेह नंतर सापडला, असे एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
दंतेवाडा डीआरजी हेड कॉन्स्टेबल सन्नू करम हे देखील कारवाईदरम्यान शहीद झाले.छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील दक्षिण अबुजमढ जंगल परिसरात नक्षलविरोधी कारवाई करण्यात आली, असे आयजी बस्तर यांनी सांगितले. हे STF ने नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर आणि कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजी संघांच्या समन्वयाने केले.
तत्पूर्वी, शुक्रवारी छत्तीसगडमधील गरीबीबंद जिल्ह्यातील कंदेशर गावात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.




