
रत्नागिरीत गतिरोधक काढण्यावरून दोन वाड्यांमध्ये मतभेद तणाव.
रस्त्यावरील गतिरोधक काढण्यावरून रत्नागिरी शहरातील कुरणवाडी विरुद्ध भाटकरवाडा असा तणाव निर्माण झाला. रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी दोन गतिरोधक काढल्यानंतर हे काम थांबवण्यासाठी भाटकरवाड्यातील ग्रामस्थ नगरपरिषद आवारात एकत्र आले.भाटकरवाडा, कुरणवाडा येथे जाणारा रस्ता श्री जोतिबा मंदिरापासून सुरु होतो. याच मंदिरापासून पुढे सांबवाडी, कोठारवाडी, कुरणवाडी येथे अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेने हे गतिरोधक टाकलेले नसून रस्त्याचे काम सुरु असताना येथील काही नागरिकांना डांबरीकरणाचे काम करणार्या कामगारांना विनंती करून टाकले असल्याच्या तक्रारी रत्नागिरी नगर परिषदेकडे आल्या.गतिरोधकांमुळे वाहने नादुरुस्त होत असल्याची कारणे देवून कुरणवाडीतील शेकडो ग्रामस्थांनी लेखी निवेदन देवून सर्व गतिरोधक काढण्याची मागणी केली. त्यानुसार रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभाग पथकाने गतिरोधक काढून टाकण्याचे काम सुरु केले. दोन गतिरोधक काढल्यानंतर भाटकरवाड्यातील ग्रामस्थ गतिरोधक काढण्याचे काम थांबवण्याच्या मागणीसाठी रनपआवारात जमा झाले. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस फौजफाटा ‘रनप’मध्ये दाखल झाला. एकीकडे गतिरोधक काढण्यास विरोध करणारे ग्रामस्थ एकत्र आल्याचे समजताच कुरणवाडीतील शेकडो ग्रामस्थ गावात जमले. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले होते.