
आधी कोकणाला पाणी द्या, मगच मराठवाड्याला; ॲड. विलास पाटणे.
मुंबई, पुण्यात एक दिवस नळाला पाणी आले नाही तर ओरड होते; परंतु कोकणातील महिला हंडाभर पाण्याकरीता दोन किमी उन्हातून पायपीट करते, याची वेदना कोणालाच नाही. त्यामुळे कोकणातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवा आणि मग मराठवाड्याला पाणी द्या, अशी स्पष्ट भूमिका कोकणचे अभ्यासक अॅड.विलास पाटणे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रश्नी न्यायाची भूमिका घेतील, ही कोकणवासीयांची अपेक्षा व्यक्त केली.
कोकणच्या वाट्याचे पाणी वळवले तरी मराठवाडा अखेर तहानलेलाच राहील. जनतेला स्वप्नात गुंतवून काहीच निष्पन्न होणार नाही. कोकणात समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा मनोदय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बोलून दाखवला. त्यासंदर्भात अॅड. पाटणे यांनी कोकणची बाजू मांडली आहे.




