
सिंधुदुर्गात महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी होणार — नारायण राणे.
कुडाळ/प्रतिनिधी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतीलअसा विश्वास भाजपाचे खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केला. कुडाळ येथे आज महायुतीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या १० वर्षात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले ,अनेक योजना जाहीर केल्या. राज्यातील महायुती सरकारनेही गेल्या दोन वर्षात विविध लोकोपयोगी योजना राबविल्या.या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.त्यामुळे या निवडणुकीत मतदार आम्हाला निश्चितपणे साथ देतील आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, त्यांना आम्ही निवडून आणणारच असे सांगत कुडाळ -मालवण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिंदे सेनेचे डॉ.निलेश राणे हे ५० हजाराहून अधिक मतांनी विजयी होतील असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,शिंदे सेनेचे उपनेते संजय आंग्रे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस काका कुडाळकर आदी यावेळी उपस्थित होते.