तिवरे धरणफुटीत ११ जणांचा बळी, १३ जण अजूनही बेपत्ता तिवरेवाडीतील भेंडेवाडीवर शोककळा

रत्नागिरी : चिपळूणमधील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या २४ पैकी ११ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून अद्याप १३ जणांचा शोध लागू शकलेला नाही. स्थानिक गावकर्‍यांच्या बचाव पथकाच्यावतीने युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. या घटनेत कोणाचे आईवडील गेले, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा मुलगा गेला तर कुणाचं अख्ख कुटुंबच वाहून गेलं. या घटनेनंतर तिवरे गावात धाव घेतलेल्या नातेवाईकांना आपली माणसं दिसलीच नाहीत. तर सर्वत्र पसरलेला चिखल, वाहून गेलेली घरे व अस्ताव्यस्थ पडलेले घरातील सामान हे विदारक दृष्य सर्वत्र दिसत होते. त्यामुळे या सर्व गावावर शोककळा पसरली आहे. आतापर्यंत आत्माराम धोंडू चव्हाण (७५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५५), दशरथ रविंद चव्हाण (२०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धावडे (१८) यांच्यासह ११ जणांचे मृतदेह हाती लागले असून १३ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एका मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. घटनास्थळी एनडीआरएफ तसेच स्थानिक गावकर्‍यांकडून युद्धपातळीवर शोध व मदतकार्य सुरू आहे. असे असताना राजकीय नेते मात्र एकमेकांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत अडकले आहेत.
तिवरे धरण हे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येते. हे धरण चिपळूणमध्ये असले तरी त्याच्या देखभालीचे काम दापोली येथून होत होते. या धरणात गेल्या दोन वर्षापासून गळतीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी पावसाळा सुरू होईपर्यंत याचा खात्याकडे पाठपुरावाही केला होता. परंतु त्यांच्या निष्क्रियतेमुळे तिवरे वाडीतील ग्रामस्थांना जीव गमवावा लागला आहे. हे धरण २००० साली बांधण्यात आले. या धरणाच्या क्षमतेपेक्षा पावपटही धरणात पाणी नव्हते. जर क्षमतेप्रमाणे पाणी असते तर केवढा मोठा अनर्थ घडला असता याचा विचार करणे अवघड आहे.
एकीकडे गावावर शोककळा असतानाच राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हे धरण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात बांधले गेले. त्यामुळे त्याच्या दर्जाकडे लक्ष दिले गेले नसल्याचे आरोप होत आहेत. तर हे धरण बांधणारे कंत्राटदार चिपळूणचे आमदार चव्हाण यांचे बंधूंचे खेमराज कन्स्ट्रक्शन यांनी बांधले असल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेले मृत्यू हे सरकारच्या निष्क्रीयतेचे बळी असून दोषींवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. हे धरण केवळ १९ वर्षातच फुटले त्यामुळे या धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड आहे. हे काम स्थानिक आमदार चव्हाण यांच्याशी संबंधित असलेल्या खेमराज कंपनीने केल्यामुळे ही कंपनी दुर्घटनेला जबाबदार असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. या प्रमाणे राज्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button