खड्डे न बुजविल्यास पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्ते ताब्यात घेणार; नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला ‘घरचा आहेर’

पुणे : राज्य सरकारची जबाबदारी असलेल्या पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या दोन रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नाहीत. हे काम महाराष्ट्र सरकारचे असताना मला शिव्या खाव्या लागत आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत खड्डे न बुजविल्यास हे रस्ते राज्य सरकारकडून काढून घेण्याचा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. याबाबत केंद्र सरकार राज्याला नोटीस पाठविणार असल्याचे सांगत गडकरी यांनी राज्य सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.*संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण, तसेच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कर्वेनगर येथील कमिन्स महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य महाव्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, की पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या दोन रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नाहीत. हे रस्ते राज्य सरकारचे आहेत. मात्र, मला शिव्या खाव्या लागतात. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.*पुण्यात दीड लाख कोटींची कामे*पुण्यात डिसेंबर महिन्यापर्यंत दीड लाख कोटी रुपयांची कामे सुरू केली जाणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. गडकरी म्हणाले, की पालखी मार्गाची निर्मिती करताना वृक्षतोड टाळून ८०० झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. हा पालखी मार्ग ‘ग्रीन हायवे’ करण्यासाठी शासनाने स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन पालखी मार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे. पुढील काळात नाशिक फाटा-खेड, पुणे-सातारा, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे-संभाजीनगर या रस्त्यांसह मुंबई-बंगळुरू नव्या द्रुतगती मार्गाचे कामदेखील सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button