
‘शतसंवादिनी’द्वारे गोविंदराव पटवर्धनांना आगळी आदरांजली रत्नागिरीत २१ सप्टेंबरला ; हार्मोनियम सिंफनी हे मोठे आकर्षण
रत्नागिरी* : संवादिनीगंधर्व म्हणून ओळख असलेले स्वर्गीय पंडीत गोविंदराव पटवर्धन यांची जन्मशताब्दी रत्नागिरीमध्ये अत्यंत आगळ्या सांगीतिक कार्यक्रमाने साजरी केली जाणार असून रत्नागिरीच्या सांस्कृतिक अवकाशात हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरावा अशातऱ्हेने त्याची तयारी केली जात आहे. शतसंवादिनी हा गोविंदरावांची सर्वंकष ओळख करून देणारा असा कार्यक्रम २१ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा .सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये शंभरहून अधिक संवादिनीवादक ‘हार्मोनिअम सिंफनी’ सादर करणार आहेत.रत्नागिरीत अशातऱ्हेचा कार्यक्रम प्रथमच सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध संवादिनीवादक, संगीतकार अनंत जोशी यांची आहे. याबाबत माहिती देताना चैतन्य पटवर्धन म्हणाले की, अनेक वेगवेगळ्या वाद्यांच्या एकत्रित सादरीकरणाचा सुंदर सांगीतिक आविष्कार म्हणजे सिंफनी. अशा अनेक वेगवेगळ्या वाद्यांचा परिपोष फक्त आणि फक्त हार्मोनिअमवर सादर करून त्यातून निर्माण होणारी भव्य स्वराकृती म्हणजे ‘हार्मोनिअम सिंफनी’ यामध्ये मुख्य वाद्य म्हणून हार्मोनिअम असतेच, पण गिटार, व्हायब्रोफोन, व्हायोलिन अशा अनेक वाद्यांचा स्वरमेळही हार्मोनिअमवरच निर्माण केला जातो.कार्यक्रमात काही शास्त्रीय रचनांसोबत अभंग, गजर, ठुमरी आदी प्रकार संवादिनीवर सादर केले जाणार आहेत. कार्यक्रमादरम्यान चित्र आणि रांगोळीचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध रांगोळीकार राहुल कळंबटे हे पंडीत गोविंदराव पटवर्धन यांची रांगोळी काढणार असून अनुजा कानिटकर या लाईव्ह चित्र रेखाटणार आहेत.*सिंफनीत केरवा, भजनी, झपतालचा आविष्कार*कार्यक्रमात सादर होणाऱ्या सर्व सिंफनी या केरवा, भजनी, झपताल, तीनताल अशा अस्सल भारतीय संगीतातील तालांमध्ये निबद्ध आहेत. एकाच वाद्यातून विविध प्रकारच्या वाद्यांचा अनुभव देणारी जगातील पहिली आणि एकमेव भारतीय कलाकृती म्हणजे हार्मोनिअम सिंफनी. ‘शतायुषी गोविंदराव’ या संकल्पनेमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. ‘शतसंवादिनी’ हा त्यातील आरंभाचा कार्यक्रम आहे.