
चिपळुणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार.
चिपळूण शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या हालचाली नगर परिषद स्तरावर सुरू आहेत. पुतळा सुस्थितीत असल्याचा दाखला यापूर्वीच त्याचे शिल्पकार विजय शिरगावकर यांनी दिला आहे. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून हे ऑडीट केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.बौद्ध समाजाच्या मागणीनुसार व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांच्या लढ्यानंतर २००७ साली नगर परिषदेने येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला. एवढेच नव्हे तर बहाद्दूरशेखनाका असे असलेले नाव बदलत पुतळा असलेल्या चौकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरणही केले आहे. शहराच्या मुख्य प्रवेद्वारावर असलेला हा पुतळा शहराच्या वैभवात भर टाकत आहे. महामानवाच्या पुतळ्या ठिकाणी नगर परिषद व पोलिसांचा कायम पहारा असतो. असे असताना काही दिवसांपूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या हालचाली नगर परिषदेने सुरू केल्या आहेत. www.konkantoday.com