
धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे या मागणीसाठी उपोषण
छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे या मागणीसाठी सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के हे आक्रमक झाले असून त्यांनी श्रृंगारपूरचे सरपंच विनोद पवार यांच्यासह रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.स्वराज्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीच्या लोकांनी आपल्या जिवाचे रान केले त्यातील राजेशिर्के व इतरही अनेक घराण्यांशी खुद्द शिवरायांची सोयरीक होती. यापैकीच एक राजेशिर्के घराण्याने आपले तन-मन धन अर्पण केले आहे . छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे या संकटाचा सामना केला, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांचे रक्षण केले. तब्बल 29 वर्ष त्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या बंदीवासातही त्यांनी शाहू महाराजांवर उत्तम संस्कार केले आणि कर्तुत्वान राजा घडवला मात्र येसूबाईंचे हे कर्तुत्व इतिहासाच्या पानांमध्ये झाकोळल्यासारखे आहे.या कर्तुत्ववान सम्राज्ञीचे समाधीस्थळ लोकस्मृतीतून नष्ट व्हावे ही दुर्दैवाची बाब आहे. राजधानी सातारा येथील इतिहास संशोधकांनी येसूबाईंचे समाधीस्थळ शोधून काढले आहे त्याच्या संवर्धनासाठीचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करत आहोत. येसूबाई यांचे माहेर असलेले शृंगारपूर हे गाव देखील अजूनही दुर्लक्षित आहेत. कधीकाळी या गावात त्यांच्या पितृकुल राजेशिर्के घराण्याचा फार मोठा वाडा येथे होता, सरंजाम होता. परंतु या घडीला त्याचे भग्नावशेष मिळणे ही दुर्मिळ झाले आहे अशा या विस्मृतीत गेलेल्या शृंगारपूर या गावी त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे स्फूर्ती स्थळ उभे राहावे म्हणून इतिहास संवर्धनासाठी सत्याग्रह म्हणून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व शृंगारपूरचे सरपंच विनोद भिकाजी पवार हे उपोषणाला बसले आहेत.