
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया;
मुंबई : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेवरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी पुतळा तयार करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रियानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.सिंधुदुर्गातील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय तोडफोडीवरही भाष्य केलं.शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘विरोधकांना टीका करायला वेळ आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर झालेली घटना दुर्दैवी आहे. ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. शिवरायांचा हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्यांनीच डिझाइन केले होते. ४५ किमी ताशी वेगाने वाहणारा असा वारा होता. त्यात हे नुकसान झाले आहे’.’उद्या त्या ठिकाणी नौदलाचे अधिकारी येणार आहे. तत्काळ आमचं आणि नौदलाचे अधिकारी तिथे पोहोचून महाराष्ट्राचा आराध्यदैवत असलेल्या महाराजांचा पुतळा लवकरच उभारू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. सिंधुदुर्गातील घटनेनंतर आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. ‘वैभव नाईक त्यांच्या त्या भावना आहेत. पण कायदा हातात घ्यायचे काम नाही. शांतता सुव्यवस्था सर्वांनी राखावी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.*




