
भाजपचे नेत्यांवरील टीका तात्काळ थांबवा. नाहीतर इथून पुढे प्रत्येक पत्रकार परिषदेत तुमचे नवीन नवीन घोटाळे बाहेर काढू- रामदास कदम यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा
भाजपच्या कुठल्याही नेत्यावर यापुढे टीका सहन केली जाणार नाही असा इशारा रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी रामदास कदम यांना दिला. सत्तेत असताना रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी किती वेळा प्रयत्न केले ते सांगावे असं आव्हानदेखील भाजपने दिलं आहे. त्यामुळे भाजप आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेल्याचं दिसून येतंय.रामदास कदम यांच्यावर टीका करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले की, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. सत्तेत असताना रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गासाठी किती वेळा प्रयत्न केले ते सांगावं.रामदास कदम यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यातून आता बाहेर पडावे. तुम्ही राज्याचे नेते आहात तर राज्यात अनेक प्रश्न आहेत. मुलाचा मतदारसंघ सोडून बाहेर पडा.लोटे एमआयडीसीमधील दूषित पाण्याला रामदास कदम हे जबाबदार आहेत. पर्यावरण मंत्री असताना रामदास कदम यांच्यामुळेच लोटे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपन्या आल्या असा आरोपही केदार साठे यांनी केला. भाजपचे नेत्यांवरील टीका तात्काळ थांबवा. नाहीतर इथून पुढे प्रत्येक पत्रकार परिषदेत तुमचे नवीन नवीन घोटाळे बाहेर काढू असं आव्हानही त्यांनी दिलं.2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते यांच्याविरुद्ध रामदास कदम यांनी काम केल्याचा आरोप केदार साठे यांनी केला. स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीत फक्त युती धर्म म्हणून बोलायचे आणि इतर वेळी सोयीने वागायचे हे रामदास कदम यांनी थांबवावे असं केदार साठे म्हणाले.