
संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा, दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांचे चरित्र ग्रंथ प्रकाशित करण्याची मागणी पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा मागणीला सकारात्मक प्रतिसाद
रत्नागिरी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा आणि दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांचे चरित्र ग्रंथ प्रकाशित करण्यात यावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परीट समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा निवृत्त माहिती अधिकारी श्री. प्रभाकर कासेकर यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. मंत्री महोदयांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निर्मूलन करून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले तसेच स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र दिला. तर दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी रत्नागिरीतील श्री पतीत पावन मंदिरासह राज्यभरात विद्यामंदिरांच्या इमारती, वसतिगृहे स्मशानभूमी यासारख्या अनेक समाज उपयोगी वास्तूंची उभारणी करून समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. या दोन्ही महान व्यक्तिमत्वांचे चरित्र ग्रंथ शासन स्तरावर प्रकाशित करून नव्या पिढीपर्यंत त्यांचे ऐतिहासिक कार्य पोहोचवण्याची गरज श्री. कासेकर यांनी या निवेदनात मांडली आहे. रत्नागिरी येथील एमआयडीसी विश्रामगृहात त्यांनी आज मंत्री महोदयांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले.