
प्रकल्पांच्या बाबतीत नेहमीच कुणाच्या तरी दबावाला बळी पडून निर्णय घेवू नका, अजित यशवंतराव यांचा घरचा अहेर
निवडणुका जवळ आल्या की प्रकल्पाच्या आडून राजकारण करायचे आणि निवडणुकीत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रकार आता तरी थांबले पाहिजेत. कोकणात कोणते उद्योग यावेत व कोणते येवू नयेत, याबाबतीत ठोस धोरण ठरवणे गरजेचे आहे. कोणतेही प्रकल्प येताना शासन प्रशासन आणि जनता यांच्यात संवाद असणे हे गरजेचे आहे. राजकीय फायद्यासाठी कधी विरोध आणि कधी समर्थन अशी भूमिका राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी न घेता कोकण, राज्य, देश आणि जनतेच्या भावना लक्षात घेवून प्रकल्पांबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. कुणाच्या तरी दबावाला बळी पडून नाही, असा घरचा आहेर राज्यातील सध्याच्या सत्तेच्या वाट्यात सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गट राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी दिला आहे. अजित यशवंतराव यांचा थेट रोख प्रकल्पविरोधक म्हणून प्रसिद्धीस आलेल्या अशोक वालम यांच्यावरदेखील आहे. ह दडून राहिलेले नाही.कोकणचा खरोखर विकास करायचा असेल तर भविष्यात पर्यावरणपोषण तसेच आंबा, काजू, बागायतदार यांचे नुकसान न होणार्या प्रकल्पाची राजापूरला व परिसराला गरज आहे. हे लक्षात घेवून तसे उद्योग आणण्यासाठी धोरण ठरविले पाहिजे, असेही यशवंतराव यांनी नमूद केले आहे. मात्र त्यांनी आजपर्यंत त्यासाठी काय केले हे नमूद केलेले नाही किंवा आजपर्यंत अथवा भविष्यात काय करणार आहोत, याबाबतदेखील वाच्यता केलेली नाही. www.konkantoday.com