ताज प्रकल्पाला आमचा कोणताही विरोध नाही,मात्र, स्थानिकांना बेघर करून कोणताही प्रकल्प होऊ नये-माजी आमदार राजन तेली

सावंतवाडी । प्रतिनिधी :शिरोडा वेळागर येथे होत असलेल्या ताज प्रकल्पाला आमचा कोणताही विरोध नाही.जिल्ह्यात असे पर्यटन प्रकल्प यायलाच हवेत अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, स्थानिकांना बेघर करून कोणताही प्रकल्प होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे, भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शिरोडावेळागर येथील ताज हॉटेल प्रकल्पामुळे बाधित स्थानिक १५ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर उपोषणास बसत आहेत. तसेच येथील महिला व मुले खाडीत उभे राहून या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत. ते ज्या जागेत राहत आहेत त्यांची घरे व मंदिरे आहेत ती ९ हेक्‍टर जागा त्यांना सोडा तसेच या पर्यटन प्रकल्पामुळे असलेल्या इतर ग्रामीण पर्यटनामध्ये त्यांना सामावून घ्या अशी आमची मागणी आहे. त्यांचाही या प्रकल्पाला विरोध नसून चर्चेतून हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.गोव्यासारख्या पर्यटक राज्यात असलेला ताज हॉटेलचा प्रकल्प हा केवळ ६६ एकर मध्ये आहे. इथे स्थानिकांची वस्ती असलेली ९ हेक्टर जागा जरी सोडली तरी १२० एकर जागा प्रकल्पासाठी शिल्लक राहत आहे. ती देण्यास स्थानिकांचा कोणताही विरोध नाही. स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यास हा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. मात्र तसे न केल्यानेच त्यांनी भूमापन प्रक्रियेस विरोध केला तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. यांची बाजू ऐकून घेणे ही गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button