
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर ग्रामस्तरीय समिती गठित करावी – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी,:- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर ग्रामस्तरीय समिती गठीत करुन त्यानुसार संबंधितांनी कार्यवाही करावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इनुजा शेख, सिंधुरत्न चे निमंत्रित सदस्य किरण सामंत आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर ग्रामस्तरीय समिती गठीत करुन त्यानुसार संबंधितांनी कार्यवाही करावी. जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 50 टक्के महिला लाभार्थ्यांची ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित अर्ज भरण्याची प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्ह्यातील तालुकानिहाय नोंदणीचा आढावाही यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. *पालकमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा*पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला. शासनाच्या 9 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार रोजगार इच्छुक उमेदवारांना विद्यावेतन देण्याच्या धर्तीवर ही योजना आधारित असून जिल्ह्यात महास्वयंम पोर्टलवर नोंदणी असलेले 72 हजार 748 उमेदवार आहेत. जिल्ह्यातील महास्वयंम पोर्टलवर नोंदणी असलेल्या 1 हजार 555 शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, उद्योजक हे या योजनेद्वारे रोजगार निर्माण करुन देवू शकतात अशी माहिती सहायक आयुक्त कौशल्य श्रीमती शेख यांनी बैठकीत दिली.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग वगळता अन्य प्रवर्गातील वार्षिक 1 लक्ष रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहाकरिता शुभमंगल सामूहिक/नोंदणीकृत विवाह योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा याकरिता संबंधित विभागाने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, अशी सूचनाही पालकमंत्री श्री सामंत यांनी दिली. 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंग व अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने व उपकरणे खरेदी करण्याकरिता मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत एकवेळ एकरकमी तीन हजार रुपयाचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यात 19 जुलै 2024 रोजी या योजनेचा शुभारंभ करावा. एस. टी. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिलांसाठी प्रवास सवलत योजना, महिला सन्मान योजना इत्यादी योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा चांगल्या पध्दतीने लाभ मिळावा, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. *भाट्ये नळपाणी योजना आढावा* रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये गावातील नळपाणी योजनेचा आढावा पालकमंत्री श्री सामंत यांनी घेतला. भाट्ये नळपाणी योजनेचे काम लवकरात लवकर सुरु करा. त्याकरिता आवश्यक निधी जिल्हा वार्षिक योजनेतून दिला जाईल तसेच बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठीही निधी देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी तसेच भाट्ये गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते. —-




