पहिल्या महिला वकिल कार्नेलिया सोराबजी यांच्या सनद शताब्दीचा सोहळा करणारी रत्नागिरी बार असोसिएशन पहिली संघटना

रत्नागिरी : देशातील पहिल्या महिला वकिल कार्नेलिया सोराबजी यांच्या सनद शताब्दीचा सोहळा करणारी रत्नागिरी बार असोसिएशन पहिली संघटना आहे. १०० वर्षांपूर्वी जी सामाजिक स्थिती होती, त्यात थोडे बदल होत गेले आहेत. परंतु आजही महिलांना दुय्यम समजले जाते. वकिल म्हणून बोलताना कोणीच आक्रमक होऊ नये, पण आत्मविश्वासपूर्वक बोलले पाहिजे. वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या भरपूर आहे. त्या मुट कोर्ट स्पर्धांमध्ये बक्षीसेही मिळवतात. परंतु त्या वकिलीत येत नाहीत. महिलांवर विवाहानंतर सांसारिक जबाबदारी जास्त येते. पण पुरुषांनीही महिलांना घरकामात मदत केली पाहिजे. ठरावीक कामे महिलांनीच करावीत, असे न म्हणता पुरुषांनीही मानसिकता बदलली पाहिजे, असे प्रतिपादन महिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती डेरे-मोहिते यांनी केले.देशातील व इंग्लंडमधील पहिल्या महिला वकील कार्नेलिया सोराबजी यांच्या सनद शताब्दी सोहोळ्यात त्या बोलत होत्या. रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे गोगटे महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व रत्नागिरीचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार, महाराष्ट्र प्रशासकीय ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती मृदूला भाटकर, प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी आणि रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे उपस्थित होते.न्यायमूर्ती मृदूला भाटकर म्हणाल्या की, आजचा कार्यक्रम ॲड. विलास पाटणे यांनी आयोजित केला, त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही कारण ज्यांनी इतिहासात घडवला आहे, अशा व्यक्तींची आठवण करणं, स्मरण करणं आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणं हा ॲड. पाटणे यांचा स्थायीभाव आहे. मला आज नटसम्राटमधले वाक्य आठवतंय. ज्यांना नमस्कार करायला जागा नाही ते लोक दुर्दैवी पण त्यांना नमस्कार करायला जागा आहे पण तो नमस्कार करत नाही ते लोक करंटे. आज कार्नेलिया यांना अभिवादन करायला मिळतंय. कार्नेलिया सोराबजी यांनी प्रचंड संघर्ष करून वकिलीची सनद मिळवली. महिलांठी मोठे योगदान दिले. त्यांनी विविध पुस्तकेही लिहिली आहेत. खेळाच्या मैदानात सराव करताना मुली दिसत नाहीत, ध्वजवंदन सोहळ्यालाही त्यांची संख्या कमी असते, स्त्रीत्वाचे सामाजिक भान वेगळे आहे. त्यामुळे महिला सुशिक्षित झाल्या तर स्त्रीत्वाने सुसंस्कृत झालो आहोत का याचा विचार केला पाहिजे.प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले होऊन गेल्या आणि त्यामुळे आपल्या देशातल्या सगळ्या महिला स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात. तशी कायदेविषयक शिक्षणातली सावित्रीबाई म्हणजे कार्नेलिया सोराबजी. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं. त्यामुळे आज देशाला चांगल्या वकिल, न्यायमूर्ती लाभल्या.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ॲड. विलास पाटणे, उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे, सचिव ॲड. रत्नदीप चाचले, महिला उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी केले.न्यायमूर्ती माधव जामदार म्हणाले की, सुसंस्कृतपणा आणि ज्ञान यांचा संगम रत्नागिरीत होतो, त्यामुळेच सनद शताब्दी सोहळा येथे होत आहे. महिला या खूप बलवान असतातच. न्यायाधीश म्हणून त्या सक्षम निर्णय घेतात अशी दोन उदाहरणे आज व्यासपीठावर आहेत. पुरुषी वर्चस्व असणाऱ्या वकिली क्षेत्रात महिलासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आपण या सर्वांचे कौतुक केले पाहिजे.प्रास्ताविकामध्ये बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे म्हणाले की, स्त्रीयांच्या न्याय्य हक्कांसाठी कॉर्नेलिया सोराबजी यांनी मोठे योगदान दिले. १८९० मध्ये वकिलीची पदवी घेऊनही त्यांना वकिली करता आली नाही. त्यासाठी ३२ वर्षे लढा दिला व १९२४ मध्ये सनद मिळाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉ. पां. वा. काणे हे रत्नागिरी जिल्ह्यातले. लोकमान्य टिळकांचे लॉचे विद्यार्थी व मुळचे कोकणातील न्यायमूर्ती म. गो. रानडे हे मुंबई उच्च न्यायालयातील पहिले मराठी न्यायाधीश. असा वारसा रत्नागिरीला लाभला आहे. त्यामुळे सोराबजी यांचा सनद शताब्दी सोहळा साजरा करणे हे आमचे कर्तव्य आहे.सूत्रसंचालन ॲड. शबाना वस्ता यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे यांनी करून दिला. महिला उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी आभार मानले. सुरवातीला तन्वी मोरे व स्वरा भागवत यांनी तू बुद्धी दे ही प्रार्थना सादर केली. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे, सचिव ॲड. रत्नदीप चाचले, ॲड. अवधूत कलंबटे, महिला उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर, ॲड. राहुल चाचे यांनी मेहनत घेतली.यांचा झाला सत्कारया कार्यक्रमानिमित्त उल्लेखनीय कार्य केलेल्या रत्नागिरीतील महिला वकिलांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. वकिली व्यवसाय, उच्च पदावर संधी आणि सामाजिक कार्य करणाऱ्यांचा त्यात समावेश होता. यामध्ये ज्येष्ठ ॲड. विद्या पाथरे, ॲड. अश्विनी आगाशे, ॲड. रुची महाजनी, ॲड. विनया घाग, ॲड. इंदुमती मलुष्टे, ॲड. सरोज भाटकर यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button