
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्नेह मेळाव्यात ज्येष्ठांचे वाढदिवस उत्साहात
. रत्नागिरी (प्रतिनिधी) : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा येथील ज्येष्ठ नागरिक भवनात संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात झाला. यावेळी जून महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा श्रीफळ आणि शुभेच्छापत्र देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त डेपो मॅनेजर श्री. दिलीपराव साळवी यांनी साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने ज्येष्ठांचे अभिष्टचिंतन केले. या मेळाव्यात जिल्हा परिषद आरोग्य विभाग प्रतिनिधी श्रीमती पूजा अंभोरे आणि श्री. गजानन साळुंखे यांनी पावसाळ्यातील जलजन्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना कशा कराव्यात, याविषयी माहिती दिली. पोटाचे आजार टाळण्यासाठी पाणी उकळून पिणे आणि डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी परिसर स्वच्छता आणि डास निर्मूलन उपाय योजना करण्याचे सुचित केले. भारत सरकारने ऊर्जा बचतीसाठी हर घर सौर ऊर्जा ही अनुदानित योजना अमलात आणली असून घरगुती ग्राहकांचे विज बिल शून्यावर आणण्यासाठी ती उपयुक्त ठरली आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनी प्रतिनिधी श्री. श्रीकांत प्रभाकर कुलकर्णी यांनी आपल्या पारस दर्शन कीर्ती नगर येथील कार्यालयाशी मोबाईल क्रमांक 98603 71715 व संपर्क साधण्याचे आवाहन केले. आयुष्यमान योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतच्या खर्चाचे वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्यासाठी श्रीमती पूजा पांचाळ, आशा सेविका, कुवारबाव यांच्याशीमोबाईल क्रमांक 91 46 60 20 97 वर संपर्क साधावा, असे सुधाकर देवस्थळी यांनी सुचित केले. प्रारंभी श्री.श्यामसुंदर सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी पुढील 27 जुलै रोजी होणाऱ्या मासिक मेळाव्यात ज्येष्ठ पत्रकार श्री.राजेंद्रप्रसाद मसुरकर हे रहदारीची सुरक्षा आणि ज्येष्ठ नागरिक या विषयावर पावर पॉइंट द्वारे मार्गदर्शन करणार असल्याचे जाहीर केले. शेवटी पसायदानाने मेळाव्याचा समारोप करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम, सचिव श्री. सुरेश शेलार, कोषाध्यक्ष श्री. मुकुंद जोशी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.