
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सावधगिरी, दरडी कोसळण्याची ठिकाणे जाहीर
रत्नागिरी ः पावसाळा तोंडावर आल्याने सावधगिरी म्हणून शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी आपदग्रस्त म्हणून ठरवण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेकवेळा अतिवृष्टी होते. याचा विचार करून ही ठिकाणे ठरविण्यात आली आहेत.
आपत्तीप्रवण जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळणे, भुस्सखलनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणात सोळा ठिकाणे निश्चित करण्यात आली असली तरीही जिल्ह्यातील ६४ ठिकाणे दरड प्रवण क्षेत्र आहेत. परंतु अद्यापही या ठिकाणांचे भूवैज्ञानिकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. गेल्या दहा वषर्घत दरड कोसळून अनेक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. परंतु दरडप्रवण क्षेत्रात अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा म्हणून रत्नागिरी ओळखली जाते. परंतु गेल्या दहा वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच तालुक्यात दरड कोसळणे, भुस्खलनाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भुस्खलनामुळे शेकडो एकर जागा नष्ट होत आहेत. तर दरड कोसळल्याने अनेक वाड्या नष्ट झाल्या आहेत. तर अनेक वाड्यांना आजही धोका कायम आहे.