
कार व डंपर अपघातात पाच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर नजिकच्या कुरधुंडा गावमळा येथे डंपरवर आय टेन कार आदळून झालेल्या अपघातात पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण या अपघातात जखमी झाले आहेत.
ठाणे येथील कदम कुटुंबिय आपल्या मित्रपरिवारासह गोवा येथे फिरण्यासाठी जात होते. दिपक कदम हे पुणे येथून खेड येथे आले. त्यानंतर दोन गाड्यांमधून सुमारे दहा जण गोव्याकडे निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील कुरधुंडा गावमळा येथे रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वरती असलेल्या डंपरवर आय टेन कार आदळली. या अपघातात विहान दीपक कदम (वय ५) राहणार ठाणे हा गंभीर जखमी झाला. त्याला एका दुचाकीस्वाराने वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. विहानची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले.