
कोकणवासीयांची मागणी असूनही दादर-मडगाव लोकल एक्सप्रेसची मागणी दुर्लक्षित
गणेश चतुर्थीसाठी कोकण रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही सेकंदात फुल्ल झाले. त्यामुळे या प्रकाराची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेवून दादर-सावंतवाडी-मडगाव अशी नियमित लोकल सोडण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र कोरे प्रशासन व लोकप्रतिनिधी याची दखल घेत नसल्याने ही लोकल सध्या कागदावरच आहे.कोकण रेल्वे मार्गावरून दररोज धावणार्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांंडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा पॅसेंजर, जनशताब्दी एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्यांना वर्षाचे ३६५ दिवस तुडुंब गर्दी असते. रेल्वे तिकिट आरक्षण असले तरी प्रवाशांना गुरा-ढोरांप्रमाणे कोंबलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागतो. शिवाय अनेक वेळा रेल्वे गाड्या उशिराने धावत असतात. कोकणातील प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादरपर्यंत दुसरी एक्स्प्रेस सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र अशी गाडी सोडण्याऐवजी रेल्वे प्रशासन कोरे मार्गावरून दक्षिण व उत्तर भारतातील प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन गाड्या सोडून कोकणातील प्रवाशांना वेठीस धरत आहे.www.konkantoday.com




