
शष्ठ्यब्दीपूर्ती करणाऱ्या’ मंदारमाला’ नाटकाचे कोकणात तीन प्रयोग
रत्नागिरी : निर्मितीची साठ वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘मंदारमाला’ या विद्याधर गोखले लिखित संगीत नाटकाचे तीन प्रयोग कोकणात आजपासून (दि. ११ मे) होणार आहेत.पहिल्या नाटकात प्रमुख भूमिका बजावणारे संगीतकार पंडित राम मराठे यांचे पुत्र आणि ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद मराठे यांनी ही माहिती दिली. श्री. मराठे यांनी या नाटकाची पुनर्निर्मिती केली आहे.संगीत मंदारमाला या नाटकाचा पहिला प्रयोग १९६३ साली गुढीपाडव्याला झाला होता. त्यानंतर ६१ वर्षांनी या नाटकाची पुन्हा निर्मिती करण्यात आली आहे. या नाटकाचे कथानक सतराव्या-अठराव्या शतकाती राजपुतान्यात घडत असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. नाटकाचा नायक मंदार आणि संगीतकार अशी दुहेरी भूमिका पंडित राम मराठे यांनी तेव्हा साकारली होती. एका महिलेने वडिलांच्या केलेल्या खुनामुळे कमालीचा स्त्रीद्वेष असलेल्या, ऐहिक जीवनाला विटलेल्या, मात्र कायम सप्तसुरांच्या नादब्रह्मात राहणाऱ्या आणि संगीतभक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या मंदार या संगीतकाराचा जीवनप्रवास या नाटकात मांडण्यात आला आहे.कलाभारती या संस्थेच्या सहकार्याने साठ वर्षांनंतर पंडित राम मराठे जन्मशताब्दीच्या निमित्ताने या नाटकाची निर्मिती त्यांचे पुत्र मुकुंद मराठे यांनी केली आहे. नाटकाचे दिग्दर्शन आणि संगीत मार्गदर्शनही त्यांनी केले आहे. नाटकात प्राजक्ता मराठे, देवगड येथील सुधांशु सोमण, मकरंद पाध्ये, प्रिया देव, रमेश चांदणे, भाग्येश मराठे यांच्या भूमिका आहेत.सांगलीत गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहूर्तमेढ प्रयोग म्हणून हे नाटक विष्णुदास भावे नाट्य मंदिरात सादर करण्यात आले होते. विद्याधर गोखले जन्मशताब्दी सांगता समारंभातही गेल्या ४ जानेवारी रोजी या नाटकाचा प्रयोग झाला होता. हे नाटक कोकणात चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ येथे होणार आहे. चिपळूणचा प्रयोग आज, ११ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रविवारी, १२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता, तर कुडाळ येथे १३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाचा आस्वाद नाट्यप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.