जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर.

*गणेशोत्सव, होळी तसेच इतर सण – उत्सवांनिमित्त आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईस्थित कोकणवासीय कोकणाची वाट धरतात. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी २०० पेक्षा अधिक असते. गेल्या आर्थिक वर्षात जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसला प्रवाशांची प्रचंड मागणी होती. त्यामुळे या कालावधीत या दोन्ही एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी प्रत्येकी ७६ हजार पार गेली होती. तसेच मध्य रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीत सुमारे पाच लाख प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांतून कोकणात रेल्वेगाड्या जातात. या रेल्वेगाड्यांना प्रवाशांकडून कायम प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही कालावधीतच रेल्वेची प्रतीक्षा यादी सुरू होते. १ एप्रिल २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत एकूण चार लाख ७३ हजार ९४८ प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळाली नाहीत. साधारणपणे एका दिवसाला सरासरी १,४९० प्रवासी प्रतीक्षा यादीत होते.मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजार ४३७ इतकी असून त्यातील ६८ हजार ५५५ प्रवासी द्वितीय श्रेणी डब्यांच्या प्रतीक्षा यादीत होते. तर, दुसऱ्या स्थानावर मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस असून या रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी ७६ हजार ०१८ इतकी असून यामधील ६० हजार ६४२ प्रवासी हे शयनयान डब्यांच्या प्रतीक्षा यादीत होते. गेल्या आर्थिक वर्षात जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसला प्रवाशांची प्रचंड मागणी होती. त्यामुळे या कालावधीत या दोन्ही एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजार पार गेली होती.सध्या सीएसएमटीवरून मडगावला जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीची प्रतीक्षा यादी ४०० पार झाली आहे. तर, २८ एप्रिलपासून ते १५ मेपर्यंत अनेक दिवसांतील प्रतीक्षा यादीचीही क्षमता संपली आहे. त्याप्रमाणे सीएसएमटीवरून मडगावला जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शयनयान डब्यांची प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० दरम्यान आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button