
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी छापून आलेल्या पत्रकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्यामुळे शिवसैनिकांनी प्रचार थांबविला?
नारायण राणेंचा प्रचार करण्याचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेल्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचारासाठी छापून आलेल्या पत्रकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्यामुळे शिवसैनिकांनी प्रचार थांबवल्याची माहिती समोर येत आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे निवडणूक लढवत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती, मात्र हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. ही नाराजी दूर करण्याचं काम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून केलं गेलं.उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्यामुळे शिवसैनिकांनी नारायण राणेंचा प्रचार थांबवला असल्याची माहिती मिळत आहे.रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विद्यमान खासदार विनायक राऊत यांना तिकीट दिलं आहे, त्यामुळे या मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे.www.konkantoday com




