
कोळंबे ओझरवाडीतील स्वयंभू श्री देव रक्षणेश्वराच्या सड्यावर ४२ कातळशिल्पांचा नवा खजिना सापडला
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे ओझरवाडीतील स्वयंभू श्री देव रक्षणेश्वराच्या सड्यावर ४२ कातळशिल्पांचा नवा खजिना सापडला आहे. कोळंबे येथील बापू फडके यांच्या सूचनेवरून कातळशिल्प अभ्यासक आणि कातळशिल्प संशोधन केंद्राने येथे शोधमोहीम आखली आहे. पूर्व-पश्चिम दिशेने सुमारे ३०० मीटर परिसरात ३-४ ठिकाणी पसरलेल्या या रचनांमध्ये दोन प्राण्यांच्या रचना सोडल्यास उर्वरित सर्व रचना सांकेतिक (भौमितिक) स्वरूपाच्या आहेत. साधारण ३ फूट लांब व ३ फूट रूंदीपासून १८ फूट लांब व तेवढीच रूंद अशा या चित्र रचना आहेत.गेल्या दहा-बारा वर्षांच्या संशोधनानंतर कातळशिल्पांची एकूण संख्या २२०० च्या वर गेली आहे. कोळंबे येथील घनश्याम उर्फ बापू फडके यांनी पाठपुरावा केला व शहरातील कातळशिल्प संशोधन केंद्राला भेट दिली व नंतर लगेचच संशोधन केंद्राची टीम व संशोधनाकरिता आलेल्या दिल्ली येथून जेएनयू विद्यापिठाची संशोधकांची टीमनेही भेट दिली. श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड अनुभवायला मिळणारा सुंदर आणि धीरगंभीर असा हा स्वयंभू देव श्री रक्षणेश्वराचा परिसर फडके परिवाराने जपला आहे. ओझरवाडी येथे जाताना एक वहाळ लागतो. या पात्रात पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेला एक लहानसा डोह असून, डोहाच्या कडेवर स्वयंभू रक्षणेश्वर आहे. सुमारे फूट, दीड फूट खोलीचा गोलाकार खळगा. या खळग्याच्यामध्ये शंकराच्या पिंडीसारखा आकार असून, हाच तो स्वयंभू देव रक्षणेश्वर आहे. www.konkantoday.com