
नवीन कारखाने नाहीत नवीन उद्योग नाही तरीदेखील रत्नागिरी जिल्ह्यात दुकानापासून**हॉटेल व उपहारगृहाच्या संख्येत वाढ
रत्नागिरी जिल्ह्या त नवीन उद्योग व कारखाने यांची गेल्या काही वर्षात उभारणी झाली नसताना देखील रत्नागिरी जिल्ह्यात दुकाने व उपाहारगृहांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहेरत्नागिरी तालुक्यासह खेड, चिपळूण, राजापुरातील दुकाने, हॉटेल-उपहारगृह, व्यापारी संस्थांच्या व्यवसायांचा आवाका वेगाने वाढतोय.गेल्या पाच वर्षांमध्ये या चार तालुक्यांमधील दुकानांसह हॉटेल-उपहारगृह आणि व्यापारी संस्थांमध्ये ९ हजार ६९५ ने वृद्धी झाली आहे. पर्यायाने या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या १४ हजार ८७६ गरजूंच्या हाताला काम मिळाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पायाभूत विकासासह नागरी व ग्रामीण भागातील अनेक निसर्गरम्य स्थळे, प्रसिद्ध यात्रास्थळे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे विकसित होत आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. यातूनच विविध दुकानांसह व्यापारी संस्था आणि हॉटेल उपहारगृहांची वाढ होण्यास हातभार लागत आहे. वाढत्या पर्यटकांना आवश्यक सोयी देण्यासाठी ही दुकाने आणि व्यवसाय महत्वाची भूमिका बजावत आहेत. पाच वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१६-१७ मध्ये खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तालुक्यांमध्ये ८ हजार १७५ दुकानांची नोंद सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे झाली होती. या दुकानांमध्ये ६ हजार ५७३ कामगार काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते; परंतु पाच वर्षांनंतर या चारही तालुक्यांमध्ये १४ हजार ३०८ दुकाने झाली असून, या दुकानांमध्ये १४ हजार ३०३ कामगार आहेत. जिल्ह्यात खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूरमध्ये पाच वर्षांपूर्वी ३ हजार ६०७ व्यापारी संस्थांमध्ये ७ हजार ३५० कामगारांना काम मिळाले होते. पाच वर्षानंतर याच व्यापारी संस्थांची संख्या ६ हजार ७९१ इतकी झाली असून, या संस्थांमध्ये आता १३ हजार ७१७ कामगार कार्यरत आहेत. खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूरमधील हॉटेल आणि उपहारगृहांनीसुद्धा गेल्या पाच वर्षात मोठी भरारी घेतली आहे.सन २०१६-१७ मध्ये या चार तालुक्यातील ७३० हॉटेल उपहारगृहांमध्ये २ हजार ३८६ कामगार होते. २०२२-२३ च्या नोंदीनुसार आता हॉटेल आणि उपहारगृहांची संख्या १ हजार १०८ इतकी झाली असून, येथे ३ हजार १६५ कामगार काम करत आहेत. www.konkantoday.com