
*साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राउंडवर साचलेल्या कचऱ्याची लवकरच शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लागणार*
__रत्नागिरी शहराचा वर्षानुवर्षे साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राउंडवर साचलेल्या कचऱ्याची लवकरच शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लागणार आहे.वर्षभरात बायोमायनिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कचऱ्याला लागणारी आग, निघणारा धूर आणि दुर्गंधीतून कायमची मुक्तता होणार आहे. केंद्र शासनाने यासाठी साडेसहा कोटी रुपये मंजूर केले आहेत.शहरात जमा होणारा दररोजचा कचरा साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो. तब्बल सव्वालाख मेट्रिक टन साचलेला हा कचरा शहरवासियांची डोकेदुखी बनला होता. वर्षानुवर्षे साचलेल्या या कचऱ्याखाली रासायनिक प्रक्रिया होऊन आग लागते. यातून निघणारा धूर आणि दुर्गंधी या परिसरात राहणाऱ्यांसह येथून ये-जा करणाऱ्यांना तापदायक ठरला आहे. या धूर, दुर्गंधीमुळे येथील अनेक रहिवाशांनी आपली घरे, सदनिका विकण्यास सुरवात केली. आता मात्र या त्रासातून सर्वांचीच मुक्तता होणार आहे. स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत सर्व शहरातील कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून होणाऱ्या त्रासातून सुटका करून घेण्याच्या सूचना केंद्र शासनाने केल्या. त्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाचे अधिकारी अविनाश भोईर यांनी केली. पुण्यातील भाग्योदय वेस्ट मॅनेजमेंट एजन्सीला या कामाचा ठेका मिळाला आहे. रत्नागिरी पालिकेने या एजन्सीला कार्यारंभ आदेश दिले असून, दहा महिन्यात हे काम पूर्ण करून द्यायचे आहे. त्यामुळे वर्षभरात कचऱ्याला लागणारी आग, धूर आणि येणाऱ्या दुर्गंधीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे.www.konkantoday.com




