
दिल्लीपाठोपाठ मुंबईचीही हवा प्रदूषित; एक्यूआय २९५ वर, श्वसनाच्या आजारांत ५० टक्क्यांनी वाढ
मुंबई: शहरातील हवा विषारी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून प्रदूषणामुळे श्वसन आणि दम्याचे रुग्ण ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे
रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचार आणि औषधांच्या वापरात बदल केला जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विशेषत: जे लोक आधीच फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. प्रदूषणाच्या अच्छादनामध्ये गुरफटलेले हे शहर आता उच्च जोखीम गटात मोडणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये आणखी वाढ करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील वातावरण सतत बिघडत आहे. मान्सून संपल्यानंतर शहरातील हवेचा दर्जा ‘चांगल्या’वरून ‘मध्यम’ श्रेणीपर्यंत पोहोचला आहे. काही भागात हवेची गुणवत्ता ‘खराब’वरून ‘अत्यंत खराब’ श्रेणीत गेली आहे. संपूर्ण शहराची हवा मध्यम दर्जाची असली, तरी कुलाबा, माझगाव, मालाड, चेंबूर आणि बीकेसी या भागातील हवेची वाईट दर्जाची नोंद करण्यात आली आहे.
पल्मोनोलॉजिस्ट डॉ. स्वप्नील मेहता यांनी सांगितलं की, गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून येणाऱ्या रुग्णांची मुख्य समस्या प्रदूषण आहे. ओपीडीतील संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढली आहे. रुग्णाला ताप किंवा संसर्ग नसल्यास, हवेतील धूळ आणि कणांमुळे ॲलर्जी, दमा, सीओपीडी आणि इतर फुप्फुसांशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये खोकला आणि श्वासोच्छ्वासाचा त्रास वाढू लागला आहे. आता आठ ते दहा दिवस उलटूनही आराम मिळत नसल्याचे नागरिक सांगत आहेत
प्रदूषणामुळे ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. खोकला आणि श्वासोच्छ्वासाच्या समस्यांव्यतिरिक्त, घसा खवखवणे आणि डोळ्यांची जळजळ होण्याच्या तक्रारीदेखील आहेत. या रुग्णांना आता नियमित औषधांसह इनहेलरचा जास्त डोस घ्यावा लागणार असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
हवेची गुणवत्ता खराब होते तेव्हा दमा आणि श्वसनाचे आजार वाढतात. दमा आणि सीओपीडीच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांची संख्या आपत्कालीन विभागात अधिक आहे. काहींना औषधांचा डोस वाढवावा लागतो, तर काहींची प्रकृती एवढी बिकट आहे की त्यांना दाखलही व्हावे लागते.
www.konkantoday.com