
मिरकरवाड्यातील कारवाईला लागला ब्रेक,प्रशासनाने उर्वरित अतिक्रमणे हटविण्याची कारवाई थांबवली
प्रशासनाने मिरकरवाडा जेटीवरील अतिक्रमणांवर बुधवारी धडक कारवाई हाती घेतली होती. पण या कारवाईवर राजकीय पडसाद उमटले. या परिसरातील शिवसेना पदाधिकार्यांनी मच्छिमारांवर झालेल्या अन्यायाबाबत संताप व्यक्त करत दिलेल्या राजिनाम्यानंतर पालकमंत्रीस्तरावर हा विषय पोहचल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे बुधवारी प्रशासनाने उर्वरित अतिक्रमणे हटविण्याची कारवाई थांबवली.
मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाच्या जागेतील ३०३ अनधिकृत बांधकामे पाडण्यास प्रशासनाने प्रारंभ केलेला होता. मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोलीस, महसूल प्रशासन व मत्स्य विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती. प्रशासनाने मुदत देवूनही अनधिकृत बांधकामे मच्छिमारांनी काढली नसल्यामुळे प्रशासनाने कारवाईला प्रारंभ केला होता. त्यातून मच्छिमारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे येथील मच्छिमार नेते व मिरकरवाड्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी लोकप्रतिनिधींकडून ही कारवाई थांबविण्यासाठी दखल न घेतल्यामुळे राजिनाम्यांची पत्रे शिवसेना शहरप्रमुखांना पाठविली होती. www.konkantoday.com