
गावखडी किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा,आठ कोटी ५६ लाखाचा निधी
समुद्राच्या वाढत्या लाटांच्या माऱ्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावरील सुरू बनाची दिवसेंदिवस धूप होत आहे. त्यामुळे समुद्र आत घुसत असल्याने धोका निर्माण झाला आहे. लाटांपासून किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ८ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
गावखडी समुद्रकिनाऱ्यावरील भागाचे संरक्षण करण्यासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून सुरू बनाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील लोकवस्तीचे व शेतीचे संरक्षण होत होते. परंतु गेली दोन-तीन वर्ष समुद्राच्या लाटांनी या भागातील झाडे गिळंकृत केली आहेत. समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात आत घुसत असल्याने येथील सुरु बन उदध्वस्त होत आहे. त्याच्या संरक्षणासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली होती. या संदर्भात दोन महिन्यापूर्वी त्यांनी या भागाची व परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी ग्रामस्थांना निधी देण्याचे आश्वासन दिले होते.
www.konkantoday.com




