
रत्नागिरी तालुक्यात एकाच विहिरीत सापडले दोन प्रौढांचे मृतदेह, घातपाताचा प्रकारअसण्याची शक्यता
रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील विहिरीत दोन अज्ञात प्रौढांचे मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे या मृतदेहांची ओळख अद्यापही पटलेली नसून एकाच वेळी दोन मृतदेह सापडल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आहे हीघटना आज रविवार सकाळी 10 वा. पूर्वी उघडकीस आली.यात घातपात असल्याचा संशय निर्माण होत असून सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहांचा ओळख पटलेली नाही.
यातील एक मृतदेह अंदाजे 45 तर दुसरा अंदाजे 50 वर्ष वयाच्या प्रौढाचा आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलिस पाटील लाड यांना माहिती देताच त्यांनी पूर्णगड पोलिसांना याची खबर दिली.पूर्णगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.यातील अंदाजे 45 वर्षे वय असलेल्या प्रौढाच्या अंगात काळा टिशर्ट, चॉकलेटी ट्रॅक पॅन्ट, गळ्यात जानवे हातात लाल दोरा आहे. तर 50 वर्षे वय असलेल्या प्रौढाच्या अंगात पांढरा टिशर्ट आणि राखाडी ट्रॅक पॅन्ट, गळ्यात लाल दोरा आहे. विहिरीमध्ये दोन मृतदेह सापडून आल्याने यात घातपाताचा हात असल्याचा संशय येत असल्याने आता या मृतदेहांची ओळख पटवण्याचे व त्या दिशेने तपास करण्याचे काम पूर्णगड पोलिसांनी सुरू केले आहे
www.konkantoday.com