
साखर कारखान्यांप्रमाणेच आंबा-काजू व्यावसायिकांना मदत करावी – नीलेश राणे
सहकारी साखर कारखान्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचप्रमाणे कोकणातील आंबा, काजू बागायतदार आणि व्यावसायिकसुद्धा अडचणीत असून त्यांचासुद्धा विचार व्हावा, अशी मागणी भाजपाचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या आणि आर्थिक अडचणीत आलेल्या सहकारी साखर कारखान्यांना संजीवनी देण्यासाठी त्यांना शासन हमीवर मुदतीचे कर्ज देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर मुदती कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी धोरण जाहीर करण्यात आले असून एफएसीआर मूल्याच्या दीडपट कर्ज त्यांना दिले जाणार आहे. यासाठी शासनाने एकूण ३२ अटी ठेवल्या आहेत. त्याची कारखान्यांना पूर्तता करावी लागणार आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यातून डबघाईला आलेल्या अनेक साखर कारखान्यांना मोठा मदतीचा हात शासनाकडून मिळणार आहे.
ज्याप्रमाणे साखर कारखानदार अडचणीत आहेत, त्याप्रमाणे कोकणातील मुख्य पीक असलेल्या आंबा-काजू पिकाचे बागातदार आणि व्यावसायिकसुद्धा अडचणीत असून त्यांनाही मदतीची गरज आहे. कोकणात मासळीपाठोपाठ आंबा आणि काजू ही फळ पिके मुख्य पिके आहेत. मात्र हवामानावर आधारित या पिकांना गेली अनेक वर्षे हवामान बदलाचा मोठा फटका बसला असून अनेक बागायतदार आणि व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. आपल्या या अडचणी शासनाने सोडवाव्यात, यासाठी हे बागायतदार आणि व्यावसायिक सातत्याने वेगवेगळी आंदोलने, परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे दाद मागत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांसोबतच कोकणातील या बागायतदार आणि व्यावसायिकांचाही शासनाने विचार करावा, अशी मागणी नीलेश राणे यांनी केली आहे.
www.konkantoday.com